गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 15 हजार 248 क्युसेक्स विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Foto
नाशिक : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस बरसत असून गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तर अमरधामकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून गोदावरी नदीकाठच्या काही रहिवासी भागात पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान नागरिकांना विनाकारण नदीकाठावर जाण्यास प्रशासनाने मनाई केली असून शहरात शाळा कॉलेज ला सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून आज दुपारी 12 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 15 हजार 248 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदीपात्रातील साहित्य व जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन विसर्ग 15 हजार 248 क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्याने आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, नदीपात्रात कोणतेही साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. तसेच पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात मागील ५ दिवसांपासून पाऊस धुमाकूळ घालताना दिसला. रेड अलर्ट दिला जात होता. जून महिन्यात जेवढा पाऊस कोसळणार होता तेवढा पाऊस १ जुलैपासून ६ जुलैपर्यंत कोसळला. नाशिकला ढगफुटीचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला होता. तशी तयारीही सुरू होती. पण ते ढग पालघर आणि गुजरातच्या दिशेने पुढे गेले. त्यामध्येच राज्यात पाऊस ओसरताना दिसत आहे. आजही काही जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. रात्रभर काही भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्हा आणि पुणे घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला. दक्षिण गुजरात केरळच्या किनार्‍यालगत किनारपट्टी समांतर कबी दाबाचा पट्टा निर्माण झाला. पुण्यातील भिडे पुल पाण्याखाली गेला. पुण्यातील खडकवासला धरणाच्या पातळीत वाढ झाली. मुंबईत आज पावसाची विश्रांती असून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.

गेल्या सात ते आठ दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे खडकवासला धरणातील पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ झाली. खडकवासला धरणातून २७००० क्युसेसने मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू झाला. एकता नगर सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाकडून उपायोजना केल्या जात आहेत. ४ पडणार्‍या मुसळधार पावसानंतर मुंबईत आज सकाळी पावसाने विश्रांती घेतली.
मुंबई आणि उपनगरात रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे. मध्य रेल्वे ५ मिनिटे उशिरा सुरु तर हार्बर आणि ट्रांस हार्बर १० मिनिटे उशिरा सुरू आहे. आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत रात्री मुसळधार पाऊस झाला. ज्यामुळे अनेक भागात पाणी साचले. वरळी गावात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. आजही पावसाचे संकट टळले नाही.

रायगड, पालघर, कोल्हापूर आणि रत्नागिरी येथील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात पाऊस होऊ शकतो. गुजरातसह अरबी समुद्र राजस्थानच्या दिशेने मॉन्सून प्रगती करेल. दोन ते तीन दिवसात मॉन्सून अरबी मसुद्र, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या दिशेने पुढे सरकेल आणि पूर्ण देशच व्यापून टाकेल. देशात पुढील काही दिवसात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.

 राज्यात दोन दिवसात १० जणांचा बळी
राज्यातील पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसाने अनेक भागांना झोडपून काढलं आहे. पावसामुळे पाणी साचणं, झाडं पडणं अशा घटनाही कायम असून विविध दुर्घटनांमध्ये १० जणांना जीव गमवावा लागला आहे. सातार्‍यातील फलटण तालुक्यातील खामगावमध्ये विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. तर गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील आसोली गावालगतच्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीसह प्रवाहात वाहून गेलेल्या व्यक्तीचा जीव गेला. दुसरीकडे नवीन पनवेल येथे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या विचुंबे येथील एका व्यक्तीचाही मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. दुर्दैवी घटना जळगावच्या अमळनेरमध्येही घडली असून तिथे खदाणीत बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला. तर भंडार्‍यात खेळता खेळता दीड वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. १० जणांच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला असून खळबळ माजली आहे.

सातार्‍यात श़ॉक लागू एकाच कुटुंबातील ४ जण दगावले
सातार्‍याती  फलटण तालुक्यात खामगाव मध्ये विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. घरासमोरील विद्युत केबलच्या तारेला स्पर्श झाला. एकमेकांना वाचवण्याच्या नादात चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये दोन महिला दोन पुरुषांचा समावेश आहे. किसन शिंदे, सचिन शिंदे, गंगुबाई शिंदे आणि आरती शिंदे अशी मृतांची नावे असून फलटण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू आहे.